विज्ञान रंजन स्पर्धा ऑगस्ट २०१६

विज्ञान रंजन स्पर्धा ऑगस्ट २०१६ .
० ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे ० प्रवेशमूल्य नाही ० प्रश्नाची उत्तरे स्वत: विचार करून, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील ० प्राथमिक फेरीतील विजेत्यांची नावे २८ ऑगस्ट २०१६ ला पुणे येथे जाहीर करण्यात येतील. ० प्राथमिक विजेत्यांची प्रात्यक्षिक प्रयोगांवर आधारित अंतिम फेरीची चाचणी ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे घेतली जाईल ० अंतिम फेरीतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. ० आपली उत्तरे फूलस्कॅप आकाराच्या कागदावर स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत पाठवावीत ० आपल्या उत्तरपत्रिकेसोबत खालील माहिती लिहून पाठवावी
–१. संपूर्ण नाव २. पत्ता ३. दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक ४. विपत्ता (ईमेल) ५. जन्मतारीख ६. शिक्षण ७. व्यवसाय ८. पुढावा गुण
पुढावा गुण – शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना खाली कंसात लिहील्याप्रमाणे गुणांचा पुढावा देण्यात येत आहे.
शिक्षण: पाचवीपर्यंत (१०), सातवीपर्यंत (८), दहावीपर्यंत (६), बारावीपर्यंत (४), शास्त्रशाखेतर पदवीधर (२), शास्त्र पदवीधर (0).
वय वर्षे: १२ पर्यंत (६), १३ ते १६ (४), १७ ते २० (२), २१ ते ४० (०), ४१ ते ६० (२), ६१ ते ८० (४), ८१ च्या वर (६).
उत्तरपत्रिका पाठवण्याचा पत्ता: मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४११०३०
प्रश्नावली

प्रश्न १ – निरीक्षण करून उत्तरे द्या (गुण १०)
१. सध्या सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे घरगुती विजेचा वापर करणारे उपकरण कोणते?
२. लाल गुलाबाच्या फुलाला किती पाकळ्या असतात?
३. १०० रुपयाच्या नोटेची पुढची आणि मागची बाजू यातला फरक डोळे मिटून कसा ओळखाल?
४. १२ ऑगस्टच्या पहाटे ४ ते ५ या वेळात पडताना दिसलेल्या उल्कांचे वर्णन थोडक्यात लिहा.
५. ५ मिनिटे जळल्यावर मेणबत्तीचे वजन किती घटते?
६. एखाद्या मोबाईलमधून जवळात जवळ किती अंतरावरचा फोटो स्पष्ट येतो ते लिहा?
७. क, च, ट, त, प या पाचपैकी कोणत्या वर्णाची पाचही मुळाक्षरे म्हणायला सर्वात कमी वेळ लागतो?
८. जमिनीवर अंडे घालणाऱ्या तीन पक्षांची नावे लिहा.
९. झेरॉक्सची पाटी आणि भाडोत्री प्रवासी वाहन यात कोणते साम्य आहे?
१०. पाच वर्षाचे मूल व सत्तर वर्षे वयाची व्यक्ती यांच्या नाडीच्या ठोक्यात फरक काय?
प्रश्न २ – चूक की बरोबर ते स्पष्ट करा (गुण १०)
१. पहिल्या १० पाढ्यांमध्ये ५५ संख्या वापरल्या जातात.
२. केळीच्या घडातली सर्व केळी एकदम पिकतात
३. सम संख्येला ९ने भाग गेला तर ६ने भाग जातोच.
४. जुलाब सुरू झाल्यास प्रथमोपचार म्हणून जुलाब बंद होण्याची गोळी घ्यावी.
५. पावसाचे पाणी नेहमी शुद्धच असते.
६. वनस्पती तूप हे वनस्पतींमध्ये बनलेले असते.
७. भारतातल्या सर्व नद्या वरून खाली वाहतात
८. रेडीओ लहरींचा शोध मार्कोनी यांनी लावला.
९. सब्जा आणि तुळशी समान कुलातले आहेत.
१०. साळींदराच्या काट्यांवरून वेल्क्रोचा शोध लागला
प्रश्न ३ – थोडक्यात उत्तर द्या (गुण १०)
१. *#06#हा क्रमांक मोबाईलवरून डायल केल्यावर कोणती माहिती मिळते?
२. १०० ग्रॅम अंड्यामधून आपल्या रोजच्या गरजेला पुरून उरेल असे कोणते जीवनसत्व मिळते?
३. PY या अक्षरांनी सुरू होणारी वाहने भारतात कोणत्या राज्यात नोंदविलेली असतात ?
४. आईला बाळाबद्दल खूप जिव्हाळा वाटतो तेव्हा तिच्या शरीरात निर्माण होणारे रसायन कोणते?
५. आयोडीनला गलगंड तर सेलेनियमला काय?
६. क्षकिरणांनी हाडांचे चित्र मिळते तर शरीरातील मऊ भागाचे चित्र कोणत्या तंत्राने मिळते?
७. खाद्य पदार्थ ठेवण्याच्या प्लास्टिकच्या डब्यावर कोणचे चिन्ह काढतात?
८. दक्षिण अमेरिकच्या समुद्रातील कोणते दोन प्रवाह भारतातल्या पावसावर परिणाम करतात?
९. रक्तदानापूर्वी रक्ताची कोणती तपासणी करतात?
१०. वृक्ष आयुर्वेद या विषयावर भारतात पहिले लिखाण करणारा कृषीतज्ज्ञ कोण?
प्रश्न ४ – शास्त्रीय कारणे लिहा (गुण २०)
१. आकाशातील वीज घरगुती किंवा औद्योगिक कामासाठी वापरता येत नाही.
२. आषाढ तळायचा, श्रावण भाजायचा तर भाद्रपद उकडायचा महिना आहे.
३. कमी पाउस पडणाऱ्या प्रदेशातील झाडांची पाने आकाराने लहान असतात.
४. काळा रंग हा खरा रंग नसतोच
५. टिव्हीवरील कार्यक्रम बघताना जेवण करू नये.
६. डोकेदुखीवरच्या मलमात झोंबणारे औषध असतेच.
७. नागपूरपेक्षा मुंबईत लोखंड लवकर गंजते
८. फोडणी करताना मोहरी तडतडणे आवश्यक असते.
९. महाराष्ट्रात सूर्य बरोबर डोक्यावर असेल असे एका वर्षात दोन दिवसच असतात
१०. मोबाईलमध्ये कॅमेऱ्याचे भिंग व पडदा यात अंतर कमी असते
प्रश्न ५ – खालील वाक्यातील ‘मी’ कोण? (गुण १०)
१. १९४८ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय अणुउर्जा आयोगाचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली.
२. आमच्याकडे सूर्य नेहमीच पश्चिमेला उगवतो
३. काच कापू शकणारा मी अतिशय मूल्यवान आहे.
४. माझ्या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या रेषेत कोठेही जमिनीवर पाऊस पडत नाही
५. मी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात भारतात जन्मलो, मी अणूसिद्धांत सांगितला.
६. मी कोणत्याही बाजूने पहा एकसारखाच दिसतो
७. पंढरपुरी, नागपुरी, सुरती कुठलीही असो मला चिखलात फार आवडते.
८. आमचे भाकीत शंभर वर्षांपूर्वी झाले पण सिद्ध यंदा
९. शरीराला ऊर्जा पुरवते, आईकडूनच तुम्हाला मिळते
१०. ताल अर्जुन साल हे सगळे माझेच प्रकार आहेत
प्रश्न ६ – सविस्तर उत्तरे लिहा – गुण १५
१. उत्तम दर्जाच्या धुण्याच्या पावडरीत कोणकोणती रसायने कोणकोणत्या कार्यांसाठी घालतात?
२. क्रिकेटच्या ५० षटकांच्या सामन्यात एक फलंदाज कमाल किती धावा नाबाद राहून करू शकेल?
३. चालकाशिवाय चालणाऱ्या वाहनांचे धोके कोणते?
४. पृथ्वीवरील हवेत ३० कोटी वर्षांपूर्वी ३५% ऑक्सिजन होता तेव्हाचे सजीव आणि आजचे सजीव यांच्यात असू शकणारे पाच फरक लिहा?
५. भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे काय ? तो कसा ठरवितात ?
प्रश्न ७ – प्रयोग रचा / करा (गुण १५)
१. अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू आपल्या आईला कशामुळे ओळखू शकत असेल? हे तपाण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रयोग करावा लागेल?
२. कोनमापक कागदावर ठेवून न उचलता २७३० चा कोन काढा. भूमितीय सिद्धता द्या.
३. गहू अंकूरताना साखरच खत म्हणून वापरले तर १० दिवसात कोणता फरक पडतो? प्रयोग करा. जास्तीत जास्त तपशिलासह निष्कर्ष लिहा.
प्रश्न ८ – आकृती काढून ऊत्तरे द्या (गुण १५)
१. कांडी, बांगडी, गोळा यांच्या आकाराच्या चुंबकांचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आकृती काढून दाखवा
२. ABCDचौरसाचा कर्ण BD काढा. दुसरा कर्ण पाऊण आकाराचा AE काढा. E बिंदूतून दोन बाजूंपर्यंत जाणारी व पहिल्या कर्णाला समांतर रेषा FG काढा. त्याच टोकातून DC बाजूला समांतर रेषा पहिल्या कर्णाला H येथे मिळेपर्यंत काढा. F आणि G बिंदूंमधून पहिल्या कर्णावर लंब टाका. कोणकोणत्या आणि किती भौमितीक आकृत्या दिसतात ते लिहा.
३. धुळे, रत्नागिरी आणि वाशिम या गावांमधून तीन गट मोटारींतून एकाच वेळी निघाले. त्यांना पुढील अटी पाळून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शहरांमधून जायचे होते. १) प्रवास सुरू केल्यापासून १०० किमीच्या आत थांबायचे नाही. २) १०० ते १५० किमी प्रवासादरम्यानच काटकोनात दिशा बदलायची. ३) ५००० किमी इतकाच प्रवास करायचा. कोणत्या गटाचा मार्ग कसा असेल ते नकाशात दाखवा.

आवाहन – स्वत: भाग घ्या. इतरांना प्रोत्साहन द्या. प्रश्नावलीचा प्रचार आणि प्रसार करा.. बक्षिसासाठी रक्कम द्या. तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला पाठवा. आमचा ब्लॉग पहा. http://mavipapunevibhag.blogspot.in
मराठी भाषा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यात आपले योगदान द्या.
संपर्क: मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ३०. संजय नाईक ९४२२५१९४२०

Leave a Reply

Your email address will not be published.