विज्ञान रंजन स्पर्धा 2019

विज्ञान रंजन स्पर्धा 2019
सूचना- प्रवेश मुल्य नाही. आकर्षक बक्षिसे. खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, इतरत्र शोधून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील.उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030 येथे पोचवावीत. प्राथमिक विजेत्यांची नावे 20 फेब्रुवारीला जाहीर केली जातील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्राथमिक विजेत्यांची अंतिम फेरी 28 फेब्रु. ते 2 मार्च काळात – गांधी विज्ञान संमेलन, सेवाग्राम, वर्धा येथे होईल
शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत(10), सातवीपर्यंत (9), दहावीपर्यंत (7), बारावीपर्यंत*(5), पदवीपर्यंत*(3),*शास्त्र-शाखा असल्यास (0)
वय वर्षे:13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81च्यावर (6).
*आपल्या उत्तरपत्रिकेसोबत पुढील माहिती लिहून पाठवावी -*
1. संपूर्ण नाव, 2. पत्ता (पिनकोडसह), 3. संपर्क दूरध्वनी /भ्रमणभाष, 4. ई-मेल 5. जन्मतारीख, 6. शिक्षण, 7. व्यवसाय, 8. पुढावा गुण –शिक्षणानुसार + वयानुसार (वरील नियम पहा)
————————————————————————————————————————————————————————————–
*प्रश्नावली*

प्र. 1 – निरीक्षण करून उत्तरे द्या. (गुण 10)
1) कॅरम बोर्डच्या मधल्या वर्तुळाचा व्यास सोंगटीच्या व्यासाच्या किती पट असतो?
2) सुईचा नंबर तिच्या कोणत्या गुणधर्माशी निगडीत असतो?
3) उभे राहून, गुडघ्यावर बसून आणि मांडी घालून तुमच्या येणाऱ्या उंचीचे गुणोत्तर लिहा.
4) शेततळ्यातल्या प्लास्टिकचा पन्हा किती असतो?
5) कुत्री कोणत्या दिशेला तोंड करून विष्ठा टाकतात?
6) 4 फेब्रुवारी 2019ला पहाटेच्या अंधारात पूर्वेला दिसणाऱ्या ठळक चांदण्या कोणत्या?
7) काजे करण्याचे मशीनवर काजे कसे होते?
8) झोप लागत असताना कोणत्या क्रमाने आपल्या शारीरिक क्रिया बंद होत जातात?
9) बाटलीतल्या शीतपेयात थोडे दूध घातले तर काय होते?
10) वजन काट्यावर ताठ उभे राहून केलेले वजन आणि वाकून केलेले वजन यात कोणता फरक पडतो?

प्र. 2 – खालील विधानांमधील मी कोण? (गुण 10)
1) मी चंद्रावरील पाण्याचा शोध लावणारा भारतीय आहे.
2) ऑगस्ट 2018 मध्ये डेहराडून ते दिल्ली हे उड्डाण मी जैव इंधनावर केले.
3) मी आकड्यात माहिती जमा करून विश्लेषण करतो आणि व्यवहारात उपयोग सांगतो.
4) रंग गुलाबी गर पांढरा ! आत काळ्या बियांचा पसारा !!
5) मी कोणत्याही जमिनीत उगवणारे तेल बी
6) मी एक रेशमासारखा पण कृत्रिम धागा.
7) एकासारख्या आम्ही दोघी । भेटत नाही कधी ।।
8) मी सातातले एक. पांढरेशुभ्र, गारेगार आणि जगात एक नंबर वादळी.
9) पावसाळ्यात सर्वाधिक ओला कचरा आमची पोरे संपवतात.
10) मी हरवलो तर काय होईल असे वाटणाऱ्या भावनेला नोमोफोबिया म्हणतात, मी कोण?

प्र. 3 – चूक की बरोबर? (गुण 10) चूक असल्यास दुरुस्त करून लिहा
1) राजस्थान तापला तर भारतभर चांगला पाऊस होतो.
2) सर्व प्लास्टिक जैवविघटनशील असतात.
3) हवा कधी न संपणारे नैसर्गिक संसाधन आहे.
4) अंधारात फोटो क्ष किरण वापरून काढतात
5) तलावातल्या बोटीतला माणूस किनाऱ्याकडे तोंड करून चालला तर बोट किनाऱ्याकडे जाईल.
6) आपल्या उंचीच्या निम्म्या उंचीच्या आरशात आपली प्रतिमा निम्मी दिसते.
7) पृथ्वीवरील सर्व लोकांनी एकाच वेळी उंच उडी मारली तर पृथ्वाची गती कमी होईल.
8) चंद्रामुळे सूर्यग्रहण तसे बुध, गुरु, शुक्र मुळे पिधान होते.
9) उकळत्या पाण्यातल्या बुडबुड्यात ऑक्सिजन असतो.
10) आपला रोग दुसऱ्याला दिल्यावर आपण बरे होतो.

प्र. 4 – शास्त्रीय कारणे लिहा. (गुण 20)
1) त्वचेखालच्या रक्तवाहिन्या निळसर हिरवट दिसतात.
2) सकाळी उठल्यावर डोळ्याला चिपडे आलेली असतात.
3) घामाला वास असतो पण अश्रूंना वास नसतो.
4) ज्वलनशील माल नेणाऱ्या ट्रकच्या मागच्या बाजूला धातूच्या साखळ्या लोंबत असतात.
5) रात्री दूरवरचे आवाज स्पष्ट ऐकू येतात.
6) मोटारीच्या काचांचे तुकडे टोकदार होत नाहीत.
7) अंगावरून वारा गेला की गार वाटते
8) बंद कारच्या काचेतून आतल्या गोष्टी नीट दिसत नाहीत पण बाहेरच्या स्पष्ट दिसतात.
9) भूस्थिर उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करायला 1436 मिनिटे लागतात.
10) डेमु इंजिन गाडीच्या प्रत्येक डब्यावर सौर विद्युत पॅनल्स लावलेले असतात.

प्र. 5 – थोडक्यात उत्तर लिहा. (गुण 10)
1) एका वर्षी एक जानेवारीला मंगळवार होता तर दहाव्या वर्षी कोणता वार असेल?
2) भरतीची वेळ व चंद्राची तिथी यांचा संबंध काय?
3) तुमच्या नावाची ‘आस्की व्हॅल्यू’ किती आहे?
4) अॅलेक्सा कोणत्या प्रकारच्या आज्ञा पाळू शकते?
5) माणसाच्या आयुष्यात सर्वात आधी उगवणारा आणि सर्वात शेवटी उगवणारा दात कोणता?
6) कच्ची असता कैरी पक्का असता आंबा! म्हणतात – अशी चार उदाहरणे द्या.
7) साबण आणि डिटर्जंट यात फरक काय?
8) महिला = लोहपुरुष. यातली गंमत समजण्यासाठी रसायनशास्त्र मदतीला येईल. कसे?
9) घोडा, गेंडा, हरीण, डुक्कर – कोणाच्या खुराला किती बोटे (टो) असतात?
10) भर दुपारी गोलाकार इंद्रधनुष्य कोठून दिसेल?

प्र. 6 – सविस्तर उत्तर लिहा. (गुण 20)
1) संगणकातील Ctrl कीचा उपयोग काय?
2) औत, नांगर, फावडे, कुळव, टोकण ही शेतीची अवजारे कोणत्या कामांसाठी वापरतात?
3) शेतीच्या उपयोगासाठी पाण्याची क्षारता कमी कशी करता येईल?
4) X हे मूलद्रव्याचे चिन्ह असेल तर चार टोकांपैकी कुठे कोणती माहिती लिहीतात?
5) भारतात पावसाळी मोसम का असतो?
6) तुमच्या घराच्या पत्यात असणाऱ्या विविध भौगोलिक क्षेत्रांचे क्षेत्रफळ लिहा.
7) कोणते ढग किती उंचावर तयार होतात?
8) चटणीला टाचणी टोचली – कच्ची पपई पक्की पपई – असे शब्द पटपट म्हणताना बोबडी का वळते?
9) मेलेल्या जनावरांचे कोणकोणते भाग कोणकोणत्या कामांसाठी उपयोगी पडतात?
10) हायड्रोजन वायू भरलेला फुगा हवेत किती उंचीपर्यंत जाईल हे कोणत्या बाबींवर अवलंबून असते ?

प्र. 7 – सोडवा. (गुण 15)
1) गुगल मॅप्सचा वापर करून नदीवर आडवी असणारी भिंत पूल आहे का बांध आहे हे कसे ओळखाल?
2) कोणाही वीस जणांचे आधार क्रमांक घ्या. त्यांत पुढील प्रकारांची किती कार्डे आढळतात? सम? विषम? कोणताही एक अंक दोन किंवा अधिक वेळा आलेली कार्डे? कोणताही एक अंक सलग दोन किंवा अधिक वेळा आलेली कार्डे? सर्व 0 ते 9 अंक असलेली कार्डे? यावरून कोणते निष्कर्ष निघतात?
3) कोमट पाण्याने विसळलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीत उदबत्तीचा धूर सोडा. टोपण बंद करून बाटली कमी जास्त दाबली तर काय होते? त्याचे कारण काय?
4) दोन पूर्ण वर्ग संख्यांच्या बेरजेचा वर्ग अन्य दोन पूर्ण वर्ग संख्यांच्या बेरजेइतका असतो – हे सिद्ध करणारी चार उदाहरणे द्या.
5) समुद्रकिनारी काही मीटर उंचावर टांगलेल्या दिव्याचा प्रकाश त्याच्यापासून किती मीटर दूरवर असणाऱ्या बोटीला दिसेल याचे उत्तर कसे काढणार?

प्र. 8 – निबंध लिहा – (गुण 15)
माणसाला रोज मलमूत्र विसर्जन करावे लागते. त्यातून स्वच्छता, आरोग्य, ड्रेनेज, संडासची रचना, पाण्याचा वापर, मलमूत्राची हाताळणी, मानवी आत्मसन्मान असे प्रश्न निर्माण होतात. मलमूत्राची विल्हेवाट लावण्याचे सूत्र गांधीजींनी दोन शब्दात सांगितले – टट्टीपर मिटृटी. हे उत्तर अंमलात आणल्यास होणारे फायदे-तोटे कोणते?

____________________________________________________________________________________________________________________________
विज्ञान रंजन स्पर्धा – विज्ञानाचा शोध घेण्यासाठी एक संधी आहे. * स्वत: भाग घ्या, इतरांना भाग घ्यायला सांगा. * या प्रश्नावलीच्या प्रती काढून वाटा. * उतरांबद्दल चर्चा करा.
* विज्ञान प्रयोगाने, विचाराने, चर्चेने वाढते. *चांगली उत्तरे देणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देणार आहोत * त्यासाठी तुम्हीही आर्थिक मदत करू शकता
संपर्क करा – मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, विनय र. र. 9422048967 संजय मा. क. 9552526909 mavipa.pune@gmail.com