स्वत: बद्दल

स्वत: बद्दल

 

मराठीतून आधुनिक विज्ञानाचा प्रसार करणे य हेतूने १९६७ साली मराठी विज्ञान परिषद ,पुणे विभाग ह्या संस्थेची स्थापना झाली. विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे रोजच्या जगण्यात सातत्याने बदल घडून येत आहेत. सुखाची उपभोगाची साधने वाढली, आजही वाढत आहेत. त्यासाधनांचा केवळ उपभोग न घेता त्यांच्या कार्यामागची रचना आणि तत्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याबद्दल कुतूहल वाटायला लावणे आणि जिज्ञासा जागी करणे हे काम परिषद करीत आहे.

ज्या सृष्टीच्या आधाराने आपण जगतो तिची माहिती घेणे, त्यातील सजीव आणि निर्जीव घटकांमधील संबंध शोधणे, त्यांचे विशेष ज्ञान करून घेणे म्हणजे विज्ञान.

ज्ञान होण्यासाठी आणि झालेल्या ज्ञानाची एकमेकात देवाणघेवाण करण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. आपल्या परिसरात असणार्या भाषेचा वापर करून परिसराचे ज्ञान होणे सोपे जाते. त्या पलीकडच्या परिसरात झालेला ज्ञान समजून येण्यासाठी आपण आपली भाषा नवनवीन शब्दांनी आणि कल्पनांनी समृद्ध करणेही तेवढेच महत्वाचे आहे. मराठी भाषा समृद्ध करणे हेही परिषदेचे उद्दिष्ट आहे.

आपल्याला ज्ञान कसे मिळते? पाहून, ऐकून, वाचून, संभाषण करून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून. आपण मिळालेल्या माहितीचे रुपांतर आपल्या बुद्धीने ज्ञानात करतो. तसे करण्याची संधी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या कार्यातून आणि कार्यक्रमांमधून समाजातील विविध घटकांना देण्याचा परिषद प्रयत्न करते.

 

1. मराठी भाषेत विज्ञान प्रसार.
2. समृद्ध मराठी भाषेत प्रभावीपणे विज्ञान व्यक्त करण्यासाठी.
3. लोकांमध्ये विज्ञान मनाची बाणवणे.
4. विज्ञान संशोधन प्रोत्साहन

 

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग

सोसायटी रजिस्ट्रेशन क्र.:MAH(691-pn-30-4-1971)

पब्लिक ट्रस्ट अॅक्ट     :F/494पुणे दि ९-७-१९७१

शासकीय मान्यता क्र.    :RICRIC- 1179/12458/IV/A

व्यवस्थापन

शिक्षण संचालनालय

अध्यक्ष – विनय र र 9422048967
उपाध्यक्ष – राजेंद्रकुमार सराफ 9822186763
कार्यवाह – संजय मा. क. 9552526909
सहकार्यवाह – निश्चय म्हात्रे 8806966993
कोषाध्यक्ष – शशी भाटे – 9420732852

घटना व नियम

संस्थेचे नाव – मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग (या पुढे ‘मविप पुणे’ असा उल्लेख केला आहे.)

1) सभासदत्व –

1.1 मविप पुणेच्या निवेदन पत्रिकेवर स्वाक्षऱ्या करणारे सभासद हे संस्थेचे सर्वप्रथम हितचिंतक सभासद असतील.

1.2 मविप पुणेचे नियम मान्य असलेल्या – कोणत्याही संस्थेस, तसेच या अठरा वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, आवश्यक अर्ज व वर्गणी पाठवून मविप पुणेचे सभासद होता येईल, या अर्जांचा विचार कार्यकारी मंडळ करेल.

1.3 व्यक्ती सभासदांचे वर्ग:-

उपकर्ते: रु.10000/- किंवा अधिक देणगी देणारे

आश्रयदाते: रु. 5000/- ते रु. 9999/- देणगी देणारे

हितचिंतक: रु. 2000/- ते रु. 4999/- देणगी देणारे

साधारण: रु. 200/- वार्षिक वर्गणी देणारे

1.4 संस्था सभासदत्वांचे वर्ग वरीलप्रमाणेच रहातील, पण त्यांची वर्गणी व्यक्ति सभासदत्वाच्या वर्गणीच्या तिप्पट राहील. प्रत्येक संस्था सभासदाला अधिकारपत्र देऊन आपला एक प्रतिनिधी मविप पुणेच्या कार्यासाठी पाठवता येईल.

1.5 उपकर्ते, आश्रयदाते व हितचिंतक या वर्गातील सभासद मविप पुणेचे आजीव सभासद मानले जातील. त्यांनी आपली वर्गणी एकरकमी अथवा हप्त्याने सहा महिन्यांच्या आत द्यावी. साधारण सभासदांनी वार्षिक वर्गणी संस्थेचे वर्ष सुरु झाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावी. नव्या सभासदाची पहिल्या वर्षाची वर्गणी त्याच्या अर्जाबरोबर घेतली जाईल. सर्व वर्गाच्या व्यक्ती-सभासदांना व संस्था सभासदांना समान मताधिकार रहातील.

1.6 कोणत्याही विद्यालयात अथवा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षाखालील विद्यार्थ्यास वार्षिक रु. 100/- वर्गणी देऊन संस्थेचे विदयार्थी सभासद होता येईल. विद्यार्थी सभासदांना संस्थेच्या साधारण सभांमध्ये व कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही, पण विद्यार्थी सभासदांसाठी ज्या योजना संस्थेमार्फत केल्या जातील त्यात भाग घेता येईल.

1.7 कोणत्याही सभासदाचे निधन झाल्यास किंवा त्याने राजीनामा दिल्यास किंवा त्याच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव संमत झाल्यास त्याचे सभासदत्व संपुष्टात येईल. त्याशिवाय, त्याची वर्गणी वेळेवर न आल्यास त्यासाठी मुदत वाढवण्याचा किंवा त्याचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाचा राहील. सभासदत्व संपले तरी त्याच्याकडून संस्थेला जी येणी असतील ती रद्द होणार नाहीत व सभासदत्व संपेपर्यत दिलेली वर्गणी त्याला परत मिळणार नाही.

1.8 मराठी विज्ञान परिषद (यापुढे मध्यवर्ती असा उल्लेख केला आहे) अथवा मराठी विज्ञान परिषदेच्या कुठल्याही विभागाचे जे सभासद झाले आहेत त्यांना मविप पुणेच्या सभासदत्व वर्गणीत सवलत मिळू शकेल. कार्यकारी मंडळाने ही सवलत ठरवावी.

2) संलग्नता –

संस्थेचे उद्देश साधण्यासाठी मुंबई येथे सन 1966 मध्ये स्थापन झालेल्या ”मराठी विज्ञान परिषद” (मध्यवर्ती) या संस्थेशी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कुठल्याही विभागाशी संलग्न रहाण्याचे व सहकार्य करण्याचे मविप पुणेचे धोरण राहील. मध्यवर्तीशी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कुठल्याही विभागाशी संलग्न राहिली तरी कायदेशीर व आर्थिक दृष्टीने मविप पुणे ही संस्था स्वतंत्र समजली जाईल.

3) उद्देशपूर्तीचे मार्ग –

संस्थेचे उद्देश साधण्यासाठी पुढील मार्गांचा उपयोग केला जाईल.

3.1 व्याख्याने व चर्चा आयोजित करणे.

3.2 नियतकालिके व पुस्तके प्रसिध्द करणे.

3.3 ग्रंथालये, वस्तुसंग्रह व प्रदर्शने इत्यादीची योजना करणे.

3.4 शिक्षण देणे, परीक्षा घेणे, स्पर्धा ठेवणे.

3.5 चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, आंतरजाल व वेळोवेळी उपलब्ध असणारी अन्य संपर्क साधने इत्यादी माध्यमांचा वापर करणे.

3.6 प्रयोगशाळा चालवणे, संशोधन करणे व सल्ला देणे.

3.7 विज्ञान संमेलन भरविणे.

3.8 मराठीतील व अन्य भाषांतील विज्ञानकार्याची माहिती संकलित करणे.

3.9 अनुदाने, शिष्यवृत्त्या, पारितोषिके देऊन प्रोत्साहन देणे.

3.10 शासनाशी, मराठी विज्ञान परिषद विविध विभाग तसेच मध्यवर्ती व अन्य संस्थांशी सहकार्य करणे.

3.11 संस्थेसाठी निधी जमवणे व संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक खर्च करणे.

3.12 स्थावर व जंगम मालमत्ता विकत घेणे, विकणे, भाडयाने देणे व घेणे व तारण ठेवणे.

3.13 संस्थेच्या उद्देशांस पोषक असे इतर योग्य उपाय योजिणे.

4) वर्षगणना-

मविप पुणेचे वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजेच भारतीय राष्ट्रीय दि. 11 चैत्र ते 10 चैत्र असे राहील.

5) सभासदांचे अधिकार –

सभासदांना पुढील अधिकार राहतील.

5.1 मविप पुणेच्या साधारण सभांमध्ये भाग घेणे व मत देणे. मात्र ज्यांची वर्गणी थकबाकी असेल त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही किंवा निवडणूकीस उभे रहाता येणार नाही. फक्त आजीव सभासदांना निवडणूकीसाठी उभे राहता येईल.

5.2 संलग्न संस्थांच्या कार्यात मविप पुणेच्या वतीने भाग घेणे.

5.3 कार्यकारी मंडळ ठरवील त्या पोटनियमांनुसार मविप पुणेचे ग्रंथालय, कार्यक्रम, साहित्य इत्यादींचा लाभ घेणे.

6) कार्यकारी मंडळ

6.1 मविप पुणेचा कारभार कार्यकारी मंडळाकडे राहील. कार्यकारी मंडळात वार्षिक साधारण सभेने निवडलेले एकूण 9 सभासद असतील. निर्वाचित सभासदाची मुदत 3 वर्षे राहील. तसेच कार्यकारी मंडळाने स्वीकृत केलेले 4 पर्यन्त सभासद असतील. स्वीकृत सभासदाची मुदत पुढील वार्षिक सभेपर्यंत राहील. कार्यकारी मंडळ आपल्यातून अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करेल.

6.2 दर वर्षी वार्षिक सभेत 3 सभासदांची निवड होईल. निवृत्त होणाऱ्या सभासदांना निवडणुकीस उभे रहाता येईल. ही घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर निवडण्यात आलेल्या 9 सभासदांपैकी 3 सभासदांची मुदत 2 वर्षे व अन्य 3 सभासदांची मुदत 1 वर्ष असेल.

6.3 कार्यकारी मंडळावरील सभासदाची जागा मध्येच रिकामी झाल्यास कार्यकारी मंडळाने स्वीकृतीने ती जागा भरावी.

6.3 कार्यकारी मंडळाच्या सभेची गणसंख्या 4 राहील.

6.4 सात दिवसांच्या पूर्वसूचनेने अध्यक्ष किंवा कोणताही कार्यवाह किंवा कार्यकारी मंडळाचे कोणतेही चार सभासद कार्यकारी मंडळाची सभा बोलवू शकतील. वार्षिक साधारण सभा समाप्त झाल्यानंतर नव्या कार्यकारी मंडळाची पहिली सभा होईल व या सभेस पूर्वसूचनेची आवश्यकता रहाणार नाही.

6.5 सर्व प्रश्नांवर सरळ मताधिक्याने कार्यकारी मंडळ निर्णय घेईल. मते समान पडल्यास सभेचे अध्यक्ष निर्णायक मत देतील. अध्यक्ष उपस्थित नसल्यास अन्य सभासदाची निवड सभेच्या अध्यक्षपदी करावी.

7) कार्यकारी मंडळाचे अधिकार

कार्यकारी मंडळाचे पुढील अधिकार असतील –

7.1 दर वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक कार्यवाह, एक सहकार्यवाह व एक कोशाध्यक्ष अशा पदाधिकाऱ्यांची आपल्यामधून निवड करणे.

7.2 कार्यकारी मंडळावर निकषांनुसार सभासद स्वीकृत करणे.

7.3 सभासदत्वाच्या अर्जावर निर्णय घेणे.

7.4 सभासदांनी पाठविलेल्या सूचनांचा विचार करणे व त्यावर निर्णय घेणे.

7.5 या नियमांना बाधक ठरणार नाहीत असे पोटनियम करणे.

7.6 मविप पुणेची वार्षिक व विशेष साधारण सभा बोलाविणे.

7.7 वार्षिक साधारण सभेला मागील वर्षांचा वृतान्त व हिशेब तपासनीसांनी तपासलेले हिशेब सादर करणे व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणे. कायदयाची हरकत नसेल तर व वार्षिक खर्च एक लाख रुपयांहून जास्त नसेल तर स्वतंत्र हिशोब तपासनीसांकडून हिशोब तपासून घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

7.8 कार्यालय, सभागृह अगर अन्य मिळकत बांधणे, विकत घेणे, भाडयाने घेणे अथवा अन्य प्रकारे त्यांची सोय करणे. मात्र स्थावर मालमत्ता घेण्यास राखीव निधीहून जास्त रक्कम खर्च होणार असल्यास किंवा कोणत्याही कारणासाठी मविप पुणेला कर्ज काढावे लागणार असल्यास त्यासाठी साधारण सभेची संमती घ्यावी लागेल.

7.9 मविप पुणेचे अधिकारी, सल्लागार व नोकरवर्ग नेमणे व त्यांची वेतनश्रेणी ठरविणे.

7.10 मविप पुणेच्या कार्याला अनुषंगिक असे कार्यक्रम करणे व कार्याला प्रसिध्दी देणे.

7.11 मविप पुणेच्या शाखा स्थापन करणे व समित्या नेमणे व त्यांच्या कार्यकक्षा व कार्याचे पोटनियम ठरवणे व त्यांना कार्यकारी मंडळाचे एक अगर अनेक अधिकार देणे व त्यांच्यावर देखरेख ठेवणे.

7.12 मविप पुणेची मालमत्ता व कागदपत्र यांची व्यवस्था ठेवणे.

7.13 मविप पुणेच्या साधनांचा उपयोग करणे व त्यांचा योग्य अटीवर सभासदांना व इतरांना लाभ देणे.

7.14 नित्य पत्रव्यवहाराव्यतिरिक्त होणारे मविप पुणेचे करारनामे, खतपत्रे वगैरे मविप पुणेला बंधनकारक करण्यासाठी त्यांवर मविप पुणेची मुद्रा वापरण्यास व मविप पुणेच्या वतीने स्वाक्षरी करण्यास कार्यकारी मंडळाच्या दोन सदस्यांना अधिकार देणे.

7.15 बँकांमध्ये मविप पुणेची खाती उघडणे व तत्संबंधी योग्य ठराव वेळोवेळी करुन योग्य त्या व्यक्तींना सदर खात्यासंबंधीचे अधिकार देणे.

7.16 मध्यवर्ती व अन्य संलग्न संस्थांशी संपर्क ठेवणे, सहकार्य देणे, प्रतिनिधी पाठवणे.

7.17 मविप पुणेच्या हिताच्या दृष्टिने इतर सर्व कार्य करणे.

8) साधारण सभा-

8.1 मविप पुणेचे वर्ष संपल्यापासून सहा महिन्यांच्या आत मविप पुणेची वार्षिक साधारण सभा कार्यकारी मंडळाकडून बोलावली जाईल.

8.2 अध्यक्षांना किंवा कार्यकारी मंडळाला आवश्यक वाटल्यास किंवा मविप पुणेच्या किमान 10 सभासदांनी लेखी मागणी केल्यास तशी मागणी कार्यालयाकडे आल्यापासून दोन महिन्यांचा आत, कार्यकारी मंडळ विशेष साधारण सभा बोलावील. विशेष साधारण सभेत फक्त कार्यक्रमपत्रिकेवरील कार्याचाच विचार होईल.

8.3 साधारण सभेची सूचना व कार्यक्रमपत्रिका सर्व सभासदांना किमान पंधरा दिवसांच्या पूर्वसूचनेने पाठविण्यात येतील. वार्षिक साधारण सभेच्या बाबतीत सूचनेबरोबर वार्षिक वृतान्त व हिशेब व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक पाठवण्यात येतील व निवडणूकीची सूचना देण्यात येईल. तथापि सभासदांची संख्या 100 हून कमी असल्यास वृतान्त, हिशोब व अंदाजपत्रक सभेतच सभासदांपुढे मांडता येतील.

8.4 साधारण सभेची गणसंख्या 20 राहील. गणसंख्येच्या अभावी वार्षिक साधारण सभा 15 मिनिटे स्थगित होऊन पुन्हा त्याच ठिकाणी भरेल व या पुन्हा भरणाऱ्या सभेस गणसंख्येची आवश्यकता राहाणार नाही. विशेष साधारण सभा गण संख्येच्या अभावी रद्द होईल.

8.5 मविप पुणेचे अध्यक्ष सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारतील, हे शक्य न झाल्यास कोणतेही पदाधिकारी अध्यक्षस्थान स्वीकारतील, हेही शक्य न झाल्यास सभा उपस्थित सभासदातून आपला अध्यक्ष निवडील.

8.6 मविप पुणेच्या घटना-नियमांची दुरुस्ती, अविश्वासाचा ठराव व विसर्जन या विषयांखेरीज अन्य प्रश्नांवर सरळ मताधिक्याने साधारण सभा निर्णय घेईल. मत समान पडल्यास सभेचे अध्यक्ष निर्णायक मत देतील.

8.7 वार्षिक वृतांसंबंधी व हिशेबासंबंधी सभेत प्रश्न विचारावयाचे झाल्यास सभेअगोदर चार दिवस सभासदांनी मविप पुणेच्या कार्यालयाकडे ते लेखी पाठविले पाहिजेत.

9) साधारण सभेचे अधिकार-

साधारण सभेचे पुढील अधिकार असतील :-

9.1 वार्षिक साधारण सभेत मागील वार्षिक व विशेष साधारण सभांचे इतिवृत्त, वार्षिक वृतांत, हिशोब व पुढील वर्षासाठी अंदाजपत्रक संमत करणे व पुढील वर्षासाठी आवश्यक असल्यास हिशेबतपासनीस नेमणे.

9.2 अध्यक्षांनी, कार्यकारी मंडळाने, विश्वस्तांनी व सभासदांनी मांडलेल्या सूचनांवर निर्णय घेणे.

9.3 नियमांनुसार कार्यकारी मंडळाच्या सभासदांची वार्षिक साधारण सभेत निवड करणे.

10) पदाधिकारी-

10.1 संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह व कोषाध्यक्ष हे पदाधिकारी मानले जातील.

10.2 संस्थेतर्फे किंवा संस्थेविरुध्द होणाऱ्या कायदेशीर कारवाया अध्यक्षांच्या नावे होतील.

10.3 कार्यवाहानी अन्य पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने व कार्यकारी मंडळाच्या आदेशानुसार सर्व कार्य करावे. एकंदर 10000/- रुपयापर्यंत अनामत रक्कम कार्यवाहांना स्वतःजवळ ठेवता येईल. कार्यवाहांनी साधारण सभांची व कार्यकारी मंडळाच्या सभांची टिपणे लिहावीत, मविप पुणेची मुद्रा व दप्तर यांचा संभाळ करावा व पत्रव्यवहार करावा.

10.4 कोषाध्यक्षांनी हिशोब ठेवावेत व संस्थेतर्फे होणारे खर्च योग्य नियमानुसार व ठरावानुसार होत आहेत याची खात्री करुन घ्यावी. कोषाध्यक्षांची अगर कार्यकारी मंडळाने अधिकार दिलेल्या अन्य व्यक्तीची स्वाक्षरी असलेलीच पावती कायदेशीर समजली जाईल.

11) विश्वस्त-

11.1 साधारण सभेने आपल्या सभासदांमधून संस्थेचे विश्वस्त निवडावेत, त्यांची कार्यमुदत ठरवावी, त्यांची संख्या ठरवावी, त्यांचे अधिकार ठरवावेत, व कार्यकारी मंडळाचे एक अगर अनेक अधिकार त्यांस द्यावेत.

11.2 असे विश्वस्त मंडळ नेमले न गेल्यास कार्यकारी मंडळ हेच संस्थेचे विश्वस्त समजले जातील.

11.3 विश्वस्त नेमण्याविषयी सूचना सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत असायला पाहिजे.

12) निवडणूकी-

12.1 दरवर्षी वार्षिक साधारण सभेत कार्यकारी मंडळाच्या 3 जागांसाठी निवडणूक होईल.

12.2 निवडणूकीसाठी उभा रहाणारा उमेदवार व मतदार हा निवडणुकीच्या सभेअगोदर किमान 3 महिने संस्थेचा सभासद असला पाहिजे व निवडणुकीच्या सभेच्या वेळे अगोदरच्या 72 तासात त्याच्याकडून कोणतीही वर्गणी येणे बाकी असता कामा नये.

12.3 उमेदवाराचा सूचना व अनुमोदनासहित लेखी अर्ज निवडणुकीच्या सभेपूर्वी किमान 72 तास अगोदर कार्यालयाकडे पोचला पाहिजे. या अर्जाची छाननी निवडणूक व्यवस्थापक करतील व योग्य ठरलेले अर्ज कार्यालयात जाहीर करतील. सभेमध्ये निवडणूक होईपर्यत नाव मागे घेण्यास उमेदवारांना संधी देण्यात येईल.

12.3 कार्यकारी मंडळ निवडणूक व्यवस्थापकांची नेमणूक करील. निवडणूक व्यवस्थापक हे स्वतः उमेदवार असता कामा नयेत. आवश्यक वाटल्यास साधारण सभा व्यवस्थापकांची नेमणूक करील व व्यवस्थापकांनी सभेस दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल.

12.5 निवडून द्यावयाच्या जागांइतके किंवा कमी उमेदवार उभे असले तर त्यांची बिनविरोध निवड होईल. निवडून द्यावयाच्या जागाहून जास्त उमेदवार असल्यास निवडणुकी होतील. मतदानाचा अधिकार असलेले उपस्थित सभासद गुप्त मतदानपध्दतीने मते देतील. जितक्या जागा असतील तितक्या किंवा कमी उमेदवारांना प्रत्येकी एक या प्रमाणे मत देण्याचा मतदाराला अधिकार राहील. समप्रमाणात मते पडल्यास चिठ्ठया टाकून निर्णय घेण्यात येईल.

13) अविश्वासाचा ठराव-

एखाद्या सभासदाचे वर्तन मविप पुणेच्या हिताला बाधक आहे असे वाटल्यास साधारण सभेला त्या सभासदाविरुध्द उपस्थितांची किमान 2/3 मते मिळवून अविश्वासाचा ठराव संमत करता येईल व असा ठराव संमत झाल्यापासून त्या सभासदाचे सभासदत्व रद्द होईल. ठरावाची सूचना सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर असली पाहिजे व ठराव संमत करणारी सभा गणसंख्येच्या अभावी स्थगित झालेली सभा असता कामा नये.

14) घटना नियमदुरुस्ती-

14.1 मविप पुणेचे नियम दुरुस्त करण्याचा साधारण सभेला अधिकार राहील. संस्थेचे नाव किंवा उद्देश याव्यतिरिक्त अन्य नियम दुरुस्त करावयाचे असल्यास दुरुस्तीची सूचना सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर असली पाहिजे व ठराव करणारी सभा गणसंख्येच्या अभावी स्थगित झालेली नसली पाहिजे. उपस्थित सभासदांपैकी किमान 2/3 सभासदांनी सूचनेच्या किंवा सभेत मांडलेल्या उपसूचनांच्या बाजूने मत दिल्यास अशी सूचना व उपसूचना मंजूर होऊन त्यानुसार नियम दुरुस्त होतील. असंमत झालेली सूचना निदान 6 महिने पुन्हा विचारार्थ घेतली जाणार नाही. नवीन नियम करणे, जुने नियम गाळणे किंवा बदलणे यांचा नियम दुरुस्तीत अंतर्भाव होतो.

14.2 संस्थेचे नाव किंवा उद्देश बदलायचे झाल्यास त्याविषयीची सूचना सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्टनुसार संमत झाली तरच त्या सूचनेनुसार नाव किंवा उद्देश यात दुरुस्ती होईल.

15) विसर्जन-

सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्टनुसार विसर्जनाची सूचना संमत झाल्यास संस्थेचे विसर्जन होईल. आयकर विभागाच्या समकालीन नियमांनुसार संस्थेच्या मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचे कार्य विद्यमान पदाधिकारी करतील.

16) निधी व मालमत्ता-

16.1 मविप पुणेला मिळणाऱ्या सर्व देणग्या, वर्गण्या, अनुदाने व इतर सर्व उत्पन्न यांचा समावेश मविप पुणेच्या निधीत होईल.

16.2 आजीव सभासदांच्या वर्गणीचा 15 टक्के भाग, कोणत्याही अटीवाचून मिळालेल्या द्रव्यरुपी देणग्यांचा 15 टक्के भाग व स्थावर मालमत्तेसाठीच मिळालेले उत्पन्न मिळून एक राखीव निधी करण्यात येईल व त्याचा वापर स्थावर मालमत्ता घेण्यासाठी करण्यात येईल. साधारण सभेने संमती दिल्यास अन्य कार्यासाठी या निधीचा उपयोग करता येईल.

16.3 संस्थेच्या स्थावर व इतर मालमत्तेची व्यवस्था कार्यकारी मंडळाकडे राहील.

17) संकीर्ण –

17.1 संस्थेचे सर्व व्यवहार प्रामुख्याने मराठीतून होतील.

17.2 संस्थेच्या वतीने व नियमांनुसार कार्य करणाऱ्या सभासदांना त्या कार्यामुळे कायदेशीर किंवा अन्य कारणामुळे व्यक्तिशः जबाबदार धरले जाणार नाही. कार्य करण्यासाठी केलेली त्यांची नेमणूक कायदेशीर नव्हती असे नंतर दिसले तरी त्यांनी केलले कार्य कायदेशीर समजले जाईल.

17.3 साधारण सभांची व कार्यकारी मंडळाच्या सभांची टिपणे पुढील सभेत वाचून संमत करण्यांत येतील. टिपणी संमत करणाऱ्या सभेच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केल्यावर टिपणे संमत व बंधनकारक मानली जातील.

17.4 कोणत्याही सभेची सूचना चुकून किंवा पराधीन कारणांमुळे काही सभासदांना अजिबात अथवा वेळेवेर न पोचल्यास त्यामुळे त्या सभेचे कार्य बेकायदेशीर ठरणार नाही.

17.5 कोणत्याही प्रश्नावरील मतदान हस्तप्रदर्शनाने होईल, परंतु कोणत्याही सभासदाने अगोदर मागणी केल्यास गुप्तपध्दतीने होईल.

17.6 सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्टमधील तरतुदींनुसार संस्थेचे कार्य केले जाईल, ज्या बाबतीत स्पष्ट निर्देशक नसतील तेथे सर्वसामान्य संकेतानुसार संस्थेचे कार्य करण्यात येईल.

सदर घटना व नियम दुरुस्ती दिनांक 29 जुलै 2018 रोजी – दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे चॅप्टर, शिवाजीनगर, पुणे 411005 येथे झालेल्या मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या विशेष साधारण सभेत मंजूर करण्यात आली.